Tuesday, 14 June 2016

चिऊ काऊचं जग


बाळाची निसर्गाशी सगळ्यात पहिली वहिली ओळख चिऊ- काऊ पासून सुरु  होते.  अख्खं  बालपण चिऊ काऊचं कुतुहूल जपण्यात,  त्यांना आंजारण्यात-गोंजारण्यात जातं.  मोठेपण जसं जसं  अंगात भिनू लागतं तसं  हे चिऊ-कौचं सुख विरून जातं.  त्याचं आयुष्य बदलत नाही. आपलं  खुपचं बदलतं. त्यांच्या अस्तित्वाची खुण म्हणजे किलबिलाट.  आणि माणसाच्या आयुष्याची खूण म्हणजे कलकलाट

 आपल्या अस्तित्वाची पसाराच  इतका पसरलेला असतो कि त्याखाली किती सुखं दडलेली आहेत ह्याचा विसर पडतो. अखंड चालणारी चिवचिव म्हणजे तिचा Energy Source.
माझी लेक अन तिच्या बरोबरीने मी हि नेहमी चिऊ- कौ शी बोलत असते. .

मी तरं चिऊताई साठी प्रश्नावली तयार केलेली पण सवयीप्रमाणे ती येताना थोडंफार बालपण हि कवितेत घेऊन आली.

रुसतं का गं  जगात तुझ्या कोणी, चिऊताई?
तुला कधी रुसलेलं पाहिलं नाही.
चिडतं, फसवतं, रागावतं, रडतं   का तुझ्या जगात कोणी, चिऊताई?
तुला कधी असं वागलेलं पाहिलं नाही.
गोंधळलेली नाती असतात का तुझ्याही जगात, चिऊताई?
तुला कधी नात्यात गोंधळलेल, पाहिलं नाही.
ज्याचं त्याचं स्वातंत्र्य तरी जगण्यात आनंद असतो का गं, चिऊताई?
तुलाकधी पारतंत्र्यात असं पाहिलं  नाही.
खूप खूप आकांशा बरोबर खूप खूप त्रास असतो का गं, चिऊताई?
तुला कधी त्रासात अशा पाहिलं नाही.


किती किती उडतेस उंच, खेचतं का मग कोणी पंख, चिऊताई?
तुला कधी हरून बसलेलं पाहिलं नाही.
असतील ओझी तुझ्याही पाठीवर, तरी पंखात कुठूनयेतं बळ, चिऊताई ?
घरट्यात तुझ्या पिलांशिवाय काही बाकी सुखं पाहिली  नाही
चिवचिव सारखी करतेस, आता का ग शांत बसतेस, चिऊताई ?
तुला कधी असं  हळवं होताना पाहिलं नाही.

सांग ना गं मला एकदाच, चिऊताई!
शप्पथ तुझी! गुपित तुझं कोणालाही सांगणार नाही


No comments: